महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने बारावीची परीक्षा गुरुवारपासून विभागातील 388 केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असल्याने सर्वत्र महाविद्यालयांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मात्र अजूनही काही महाविद्यालयांसमोर बेंचेस आणायचे कुठून असा प्रश्न कायम आहे.
बारावीची परीक्षा औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या पाच जिल्ह्यातील 388 केंद्रांवर घेण्यात येणार आहे. यासाठी विभागातून 1 लाख 68 हजार 424 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात औरंगाबादमधून 62 हजार 221 विद्यार्थ्यांची 126परीक्षा केेंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच बीडमध्ये 95 केंद्रांवर 39 हजार 241 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. याशिवाय जालना जिल्ह्यातून 29 हजार 515 विद्यार्थ्यांची 67 परीक्षा केेंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. याशिवाय परभणीतून 56 परीक्षा केंद्र निश्चित केले असून एकूण 24 हजार 163 विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. हिंगोली जिल्ह्याचा आकडा पाहता 13 हजार 284 विद्यार्थ्यांसाठी 34 परीक्षा केंद्रारंवर परीक्षा घेण्यात येणार आहे.
बेंचेसचा प्रश्न अजूनही कायम
यावर्षी एकाही परीक्षा केंद्रावर विद्यार्थी जमिनीवर बसून किंवा एका बाकावर दोन विद्यार्थी परीक्षा देणार नाही. बोर्डाने असे सक्त आदेश महाविद्यालयांना दिले आहेत. त्यामुळे अनेक महाविद्यालयांकडून बेंचेसची व्यवस्था करणे सुरू झाले आहे. परंतु अनेक महाविद्यालयांसमोर बेंचेस आणायचे कुठून असा प्रश्न कायम आहे.